वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रयत्न करणार : डाॅ.सुरेश खाडे

Admin


 मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 

वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याकरता पाठपुरावा करु, वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी वृत्तपत्र वितरणकरिता सेंटर शेड साठी कामगार मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून देऊ, त्याचबरोबर गटई कामगारांच्या धरतीवर वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल उपलब्ध करून देऊ, अतिक्रमणामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल काढले जाणार नाहीत असे संरक्षण देऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. 

    महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या आवाहनानंतर व वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक,राष्ट्रीय सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नातून मुंबई येथे मंत्रालयामध्ये कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीस आमदार श्री केळकर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, ज्येष्ठ सल्लागार शिवगोंड (आण्णा)खोत, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे कामगार विभागचे प्रधान सचिव,  कामगार विभाग, असंघटीत कामगार आयुक्त,  सहा.आयुक्त कामगार आदी कामगार विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
  डाॅ.खाडे यावेळी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी आपण मिरजेमध्ये वितरण सेंटर शेड उभा करून दिले आहे, असे शेड प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात असणे गरजेचे आहे. तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकत्र येऊन मागणी केल्यास कामगार मंत्रालयाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ  तसेच स्थानिक आमदारांनाही निधी देण्यासाठी विनंती करु. याशिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल अतिक्रमण म्हणून काढण्यात येऊ नयेत याबाबत नगर विकास विभागाने आदेश काढण्यास विनंती करु. गटई कामगारांच्या धरतीवर वृत्तपत्र विक्रेत्यांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून देऊ असेही आश्वासन डॉ. खाडे यांनी दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवणे आवश्यक असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार ही असंघटित कामगारांच्या नोंदणी युद्ध पातळीवर करत आहे. कामगार आयुक्त कार्यालयात सर्व ठिकाणी असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करावी. सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी ई श्रम कार्डची नोंदणी करावी असे आवाहन डॉ. खाडे यांनी केले. वृत्तपत्र विक्री व्यवसायाची पद्धत, वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न या अनुषंगाने संघटनेची चर्चा करून केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना सोयी सुविधा मिळतील यासाठी आपण पाठपुरावा करु.
    वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वृत्तपत्रांच्या मालकाने ही खर्चाचा वाटा उचलणे आवश्यक असून त्यासाठी लवकरच प्रमुख वृत्तपत्रांच्या मालक बैठक घेऊ व त्यांच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी योजना राबवण्याकरता कसा निधी उपलब्ध करता येईल यावर चर्चा करू असे आश्वासन ही डॉ.खाडे यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिले.

     आमदार श्री केळकर यांनी कामगार मंत्र्यासमोर वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न व मागण्या सविस्तर मांडत याचे प्रश्न अशी मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष श्री. पाटणकर, कार्याध्यक्ष श्री.पवार व सरचिटणीस श्री.सूर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाचे स्वरुप, प्रश्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळच करावे असा आग्रह मंत्री श्री.खाडे यांच्याकडे धरला.


ADVT


To Top