सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
शहरात भरदिवसा धुमस्टाईल टोळीने हैदोस घातला आहे. गुरुवारी विश्रामबाग आणि माधवनगरमध्ये पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरटयांनी हिसडा मारून पळवले. दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या. याप्रकरणी जयश्री राशिंगकर (रा.एस.टी. कॉलनी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तर गीता गणेश कानिटकर (रा. माधवनगर) यांनी संजयनगर पोलिससात फिर्याद दिली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखांचे दागिने लंपास केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री राशिंगकर या विश्रामबागमधील एसटी कॉलनीत राहतात.त्या गुरुवारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी काम आटोपून दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. यावेळी विकास चौकातत्या आल्या असता दुचाकीवरून पाठीमागून दोघे तरुण आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने राशिंगकार यांच्या गळ्यात असलेले १८ ग्रॅम वजनाचे ६५ हजारांचे सोन्याचे दागिने हिसडा मारून लंपास केले. तर दुसरीकडे गीता कानेटकर या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माधवनगरमधील बुधवार पेठतून योग क्लासला जाण्यासाठी निघाल्या होत्या. शनिवार पेठ येथील मंदिर जवळ पाठीमागून दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांनी कानिटकर यांच्या गळ्यात असणारी सोन्याची ५० हजार रुपये किमतीची गोफ हिसडा मारून लंपास केली. या प्रकरणी संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्या आहेत.