कुपवाडचा तलाठी लाचलुचपतच्या सापळ्यात : दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ सापडला

Admin

 

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

    गुंठेवारी प्रमाणपत्रानुसार प्लॉटची सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी १० हजाराची लाच घेताना कुपवाड तलाठी शुक्रवारी रंगेहाथ सापडला. सचिन प्रल्हाद इंगोले  (वय ३८, रा. विजयनगर कृष्णकुंज अपार्टमेंट ) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखलील पथकाने केली.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीचा  मित्र निखील आठवले यांचे आजोबा गुलाब सुदाम गाडे यांनी १९९२ मध्ये गुंठेवारी मधील सध्याच्या अजिंक्यनगर  (कुपवाड ) येथील घरजागा ही बबर काळु परीट - जमदाडे यांच्याकडुन खरेदी पत्र करुन घेतलेली आहे. या जागेचे महानगरपालिकेचे गुंठेवारी प्रमाणपत्र घेतलेले आहे. परंतु संबधित जागेच्या ७/१२ उता-याला नावे लावलेली नसल्याने ७/१२ उता-याला नावे लावण्याकरिता कुपवाड तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता सदरची  नोंद ही जुनी असल्याने त्याची नोंद ७/१२ उतार्‍यावर घालण्यासाठी तलाठी सचिन इंगोले याने तक्रारदार व्यक्तीकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतचा तक्रारी अर्ज दि. २७ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधकच्या कार्यालयास दिला होता.  संबधित तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पडताळी केल्यानंतर सचिन इंगोले याने तक्रारदाराकडे त्यांच्या मित्राचे काम करण्यासाठी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी तलाठी कार्यालयात लावलेल्या सापळ्यात  तलाठी इंगोले याला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    ही कारवाई पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरिक्षक विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी , पोलीस अंमलदार ऋषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, रविंद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव राधिका माने, चालक अनिस वंटमुरे यांनी  यशस्वी केली आहे.


To Top