भिलवडी : डिजिटल हॅलो प्रभात (शशिकांत कांबळे)
गुरुवार दि.११ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या, मुसळधार पावसाने, पलूस तालुक्यातील माळवाडीसह परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणच्या जनावरांच्या गोठ्याचे छप्पर उडून गेले.
माळवाडी सांगली रोडवर माळवाडी वसगडे दरम्यान असणाऱ्या कॅनल जवळ आंबा, बाभळ यासारखी सुमारे १०ते १५ झाडे, वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामध्ये उन्मळून पडली. यामुळे भिलवडी कडून सांगली कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनास्थळीच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावेळी वीज पुरवठा ही खंडित करण्यात आला होता. पडलेल्या झाडांमध्ये मोठ-मोठी फळांची झाडे ही असल्याने, उन्मळून जमीनदोस्त झाल्यामुळे फळांचे तसेच संबंधित झाड मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या मार्गावर असणाऱ्या काही जनावरांच्या गोठ्याची छपरे अक्षरशः उडून गेली होती. शशिकांत नेमिनाथ शेडबाळकर यांच्या जनावरांच्या गोठ्याच्या छतावरील पत्रे सुमारे शंभर ते दीडशे फुट अंतरावर जाऊन पडले.
सकाळपासूनच हवेमध्ये कमालीची उष्णता व उकाडा होता त्यामुळे सायंकाळच्या सुमारास पाऊस बरसणारच असा अनेकांनी अंदाज बांधला होता. पाऊस पडल्याने थोडासा गारवा निर्माण झाला.माळवाडीसह परिसरामध्ये पडलेल्या पावसामध्ये मोठ मोठ्या गारांचा वर्षाव झाला. सर्वत्र गारांचे सडेच्या सडे दिसून येत होते. माळवाडी वसगडे रस्त्यावर झाडे पडल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे दुचाकी चार चाकी वाहनधारकांसह इतर लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करीत या ठिकाणाहून मार्ग काढत मार्गस्थ व्हावे लागले.