आठ दिवसात रस्ता करण्याचे अधिकार्यांचे लेखी आश्वासन |
येथील पाचवा मैल ते येळावी फाटा तसेच निमणी येथील राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक-२६६ (विजापूर- गुहागर ) या रस्ताचे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले काम त्वरित सुरु करावे या प्रमुख मागणीसाठी येळावी ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली परिसरातील येळावी सह निमणी,नेहरूनगर, जुळेवाडी या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व वाहन धारकांच्यावतीने पाचवा मैल येथील चौकात रस्ता रोको करण्यात आला. सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे येथुन तासगांव, सांगली, भिलवडी, पलुस येथे जाणारी वाहतूक खोळंबली.वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक अमितदादा पाटील, निमणी चे आर.डी.पाटील, येळावी उपसरपंच मौला शिकलगार,नेहरूनगर व निमणी चे पदाधिकारी व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गाचे कोल्हापूर उपविभागीय अभियंता पी. डी. खेडेकर यांना धारेवर धरुन, रस्ता दुरुस्तीचे निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात हा रस्ता करून, वाहतुकीसाठी खुला करण्याचे लेखी आश्वासन त्यांच्याकडून घेतले. आंदोलन स्थळी तासगांव पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त होता तर,तासगांव तहसीलदार प्रशासन परिस्थिती वर लक्ष ठेवून होते.