पाण्याचा वापर काटकसरीने करा : कार्यकारी अभियंता ज्योती देवकर

Admin
सांगली :डिजिटल हॅलो प्रभात
सद्यस्थितीस कोयना व वारणा धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेता पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर पाण्याच्या योजना व इतर सिंचन योजना यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. अन्यथा पिण्यासाठी पाणी पुरवणे अत्यावश्यक असल्याने उपसा बंदी आदेश लागू करणे अपरिहार्य होईल, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
पावसाळा लांबल्यामुळे व धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने कोयना धरणातून केवळ १ हजार ५० क्युसेक्स इतकाच विसर्ग सुरू आहे. टेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही उपसा सिंचन योजनांचे आवर्तन अंशत: सुरू आहे. तसेच नदीकाठावरील लाभधारकांकडून सिंचन / बिगर सिंचनासाठी पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळी कमी होवून सिंचन व बिगरसिंचन कारणासाठी (पिण्यासाठी) पाणी अपुरे पडत आहे. सध्या कोयना धरणात 12.37 टी.एम.सी. व वारणा धरणात 11.76 टी.एम.सी. इतका पाणीसाठी उपलब्ध असल्याचे श्रीमती देवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

To Top