प्रकाश ढंग यांचा कुपवाडमधील वृत्तपत्र विक्रेत्यांकडून सत्कार |
कुपवाड शहरात वृत्तपत्र वितरण करिता वृत्तपत्र विक्रेता भवन उभारावे अशी मागणी कुपवाड शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्याकडे करण्यात आली. प्रकाश ढंग यांची भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुपवाड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याबाबत महापालिका तसेच शासन पातळीवर पाठपुरावा करून कुपवाड मध्ये वृत्तपत्र विक्रेता भवन उभारणीसाठी प्रयत्न करू अशी आश्वासन श्री ढंग यांनी दिले. सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय सरगर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रुपनर व कुपवाड शहराध्यक्ष देवानंद वसगडे यांच्या हस्ते श्री डंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब पाटील, निलेश कोष्टी आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. कुपवाड शहरांमध्ये वृत्तपत्र वितरण करण्यासाठी एकत्रित अशी जागा नाही. सध्या गावात असणाऱ्या सोसायटीसमोर वृत्तपत्र विक्रेते पहाटे एकत्र बसतात. मात्र पाऊस असताना या कामात अनेकदा अडथळे येतात. शिवाय कुपवाड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्यक्रम व विविध उपक्रम यासाठी सुद्धा हॉलची उपलब्धता नाही. सांगली व मिरज शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता भवन उभारण्यात आले आहे. मात्र कुपवाड मध्ये अद्याप वृत्तपत्र विक्रेता भवन नाही. त्यामुळे कुपवाड शहरात ही वृत्तपत्र विक्रेता भवन असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. याबाबतची मागणी कुपवाड मधील वृत्तपत्र विक्रेत्यांनी श्री.ढंग यांच्याकडे केली.