विटा : हॅलो प्रभात
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर चेअरमन विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी स्वाभिमानी शिक्षक मंडळ व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सध्या झडत आहेत. चेअरमन विनायक शिंदे यांच्या गटाचे विटा येथील संचालक संतोष जगताप यांनी विरोधकांचा समाचार घेताना असे म्हटले आहे की, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर झाल्यानंतर पहिल्याच मिटींगला स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाने संचालक मंडळांने कर्जाचा व्याजदर एक अंकी केला व वर्षभरामध्ये रेपो दरात तीन वेळा वाढ होऊन सुद्धा एक अंकी व्याजदर जैसे थे ठेवला. तसेच ठेवीचा व्याजदर हा दोन वेळा वाढविला. एक अंकी व्याजदर व उच्चांकी ठेवीचा दर यासह अनेक निर्णयामुळे सभासद समाधानी आहेत. मृत संजीवनी योजनेचे लाभ वाढवले, मृत सभासदास पंचवीस लाख कर्जमाफी, थकीत कर्ज वसुली वाढवली, NPA तरतूद तीन कोटींनी कमी केली, कर्जाचा व्याजदर कमी करून सुद्धा बँकेचा व्यवसाय १०० कोटींनी वाढविला. वर्षभरामध्ये बँकेमध्ये ऑटो डेबिट, मोबाईल ॲप या सुविधा सभासदांच्या सेवेसाठी निर्माण केल्या.
नविन इमारत व लाभांश यावर विरोधकांचे म्हणणे खोडून काढताना ते पुढे म्हणाले की, वर्षभरामध्ये सभासद हिताचे अनेक निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील सभासद अत्यंत समाधानी आहेत. परंतु विरोधकांना मात्र कावीळ झाल्यासारखे संपूर्ण जगच पिवळे दिसत आहे. विरोधकांच्या भुलथापांना सभासद बळी पडणार नाहीत. विरोधकांच्या अशा भुलथापामुळेच सभासदांनी त्यांना कायमचे घरी बसवले आहे.ज्यांनी 0% , 2% असा लाभांश दिला अशा विरोधकांनी लाभांशावर बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.बारा वर्षाच्या सत्तेत यांनी सुमारे करोडो रुपयांची बक्षीसे व बोनस पगारांची खैरात केली. परंतु स्वाभिमानीने बक्षीस, बोनस पगार बंद केला. आगामी काळात दिलेल्या वचननाम्याप्रमाणे स्वाभिमानी शिक्षक मंडळ प्रत्येक शब्द पाळणार एवढे निश्चित. वर्षभरामध्येच सुमारे ८० टक्के वचननामा पूर्ण केला आहे . येणाऱ्या काळामध्ये सभासद हिताचीच प्रत्येक गोष्ट बँकेमध्ये होणार व हेवा वाटेल असे काम बँकेचे चेअरमन विनायकराव शिंदे, व्हाईस चेअरमन अनिता काटे व संचालक मंडळाकडून पूर्ण केला जाणार.बँकेची मुख्य शाखा प्रशस्त असणे गरजेचे आहे म्हणून मागील सत्ताधाऱ्यांच्या काळात सुद्धा दोन वेळा इमारतीचा ठराव झालेला होता. स्वाभिमानी मंडळ आगामी काळात बँकेची मुख्य शाखा सुसज्ज करणार असल्याचे ते म्हणाले.२४ सप्टेंबर रोजी सर्व सभासद बंधू भगिनींनी बँकेच्या जनरल सभेसाठी डेक्कन हॉल सांगली येथे उपस्थित राहण्याचे आवाहनही संचालक संतोष जगताप यांनी केले.