'श्रावण महोत्सव ; पारंपारिक मंगळागौर' कार्यशाळा संपन्न

Admin
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
        येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात श्रावण महोत्सवा निमित्त मंगळागौर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ. जयश्री कणसे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.डी.जी.कणसे होते व मार्गदर्शक म्हणून श्रीमती मंगला जवळेकर उपस्थित होत्या. कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या माननीय सौ.जयश्री कणसे यांच्या हस्ते कलश पूजन झाले, त्यानंतर प्राचार्य डॉक्टर डी. जी. कणसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यामध्ये बोलताना त्यांनी आपली संस्कृती ,पारंपरिक सण व खेळ यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. कार्यशाळेचे दुसरे सत्र मार्गदर्शक श्रीमती मंगला जवळेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. 
        त्यांनी आपल्या भाषणात मंगळागौरीचे पारंपारिक खेळ व गाणी कशी असतात, सण का? व कसे साजरे करावेत याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याच बरोबर त्यांनी काही खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थित महिलांनाही शिकविले. तिसऱ्या सत्रात सौ.अनिता माने, सौ. भगत, सौ.मठद, सौ. स्वप्नाली गायकवाड यांनी मंगळागौरीचे विविध खेळ उपस्थित विद्यार्थिनीना प्रात्यक्षितातून शिकविले. कार्यशाळा प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रा. सौ. भारती भावीकट्टी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सौ. रोहिणी वाघमारे यांनी केले तर प्रा.वासंती गावडे यांनी आभार मानले.
To Top