"वारणा’ची म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ

Admin
'वारणा’ची म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ : आ. विनय कोरे यांची घोषणा
वारणानगर : डिजिटल हॅलो प्रभात
वारणा दूध संघाची अहवालसालात ४०० कोटींची वाढ होऊन १३८९ कोटींची वार्षिक उलाढाल झाली आहे. दूध दराबाबत जीवघेणी स्पर्धा सुरू असून फरक बिल नको असलेल्या उत्पादकांना म्हशीच्या दुधास प्रतिलिटर ३ रुपये, फरक बिल हवे असलेल्या दूध उत्पादकांना १ रुपयाची दरवाढ करणार असल्याची घोषणा अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली. वारणा दूध संघाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. कोरे म्हणाले, वारणाने दूध उत्पादकांना दूध दराबरोबरीने विविध सवलती, फरकबिलासारखे लाभ दिले आहेत. सहकारी तत्त्वावरील संस्था मोडीत काढण्याचा कुटील डाव बाहेरील कंपन्या जादा दराचे अमिष दाखवून करीत आहेत. यावर पर्याय म्हणून वारणाकडून ज्या म्हैस दूध उत्पादकांना फरकबिल नको आहे, त्यांना प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ, तर ज्यांना फरकबिल हवे आहे त्यांना १ रुपयांची वाढ आणि फरकबिल २ रुपये ५० पैसे देण्यात येईल. संघास अहवाल सालात ५५ कोटींचा नफा झाला आहे. भारतीय संरक्षण दलात ३४ कोटींची दूध विक्री झाली असून २ लाख दूध उत्पादकांना आधार देणारा वारणा दूध संघ आहे. पुढील वर्षी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचेही आ. कोरे यांनी सांगितले. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष एच.आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. यावेळी नॅशनल को-ऑप. डेअरी फेडरेशनचे कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा, व्यवस्थापक अविनाश धुले, वारणा दूध संघाचे विक्रेते मंजीव अग्रवाल, भारतीय रेल्वेचे वारणाचे राष्ट्रीय वितरक अमित कामत, आंध्र प्रदेशातील दुग्ध उद्योजक हर्षा ग्रांधी आदींना सन्मानित करण्यात आले.
कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी विषयवाचन व अहवालवाचन केले. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, ए.डी. शिंदे आणि कंपनीचे चार्टर्ड अकौंटंट रणजित शिंदे, अमर पाटील, संघाचे संचालक व वारणा समुहातील संचालक, सभासद उपस्थित होते. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले. शितल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.
To Top