जत : डिजिटल हॅलो प्रभात
देशात हिंदी भाषेला अधिक चालना मिळावी म्हणून संपूर्ण देशात १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. भारत हा वैविध्यपूर्ण देश असून देशातील ७७ टक्के लोक हिंदी भाषा बोलतात व लिहितात. हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदी भाषा ही राष्ट्रभाषेची हक्कदार आहे, असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय जत, येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताह समारोपाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख प्रा.एच.डी. टोंगारे हे होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. एच.डी.टोंगारे म्हणाले की, हिंदी भाषेला स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली वारसा लाभलेला असून हिंदी भाषेने देशाला एकत्र जोडून ठेवण्याचे काम केलेले आहे, असे सांगून त्यांनी हिंदी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा - भित्तीपात्रिका, गीतगायन, शेरो - शायरी व गजल, वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, काव्यवाचन इत्यादी स्पर्धेत बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या हस्ते व हिंदी विभागप्रमुख प्रा.एच. डी. टोंगारे, ग्रंथपाल प्रा.अभयकुमार पाटील, डॉ.सतीशकुमार पडोळकर, प्रा.लता करांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. हिंदी सप्ताहा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सुवर्णा सावंत हिने तर प्रास्ताविक कु.सानिका लवटे यांनी केले. शेवटी आभार कु.ऋतुजा शिंदे हिने मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथालय स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.