पुणे : डिजिटल हॅलो प्रभात
पुणे शहरात पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून मोठा आमली पदार्थाचासाठा जप्त केला आहे. तब्बल १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहे. या मेफिड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपए एवढी आहे. मात्र, ससून रुग्णालय परिसरात हे ड्रग्ज आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मेफिड्रोनप्रकरणी हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. सध्या वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. दरम्यान, ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का, येथील स्टाफचा संबंध आहे का, या अनुषंगाने देखील पोलिस तपास सुरू आहे.