मिरजेचा पूल पाडावाच लागेल ?

Admin

 

मिरजेचा पूल पाडावाच लागेल ?
राम करण यादव ; राज्य शासनाकडून ९ कोटी मिळायला हवेत 


सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
सांगली शहराला जोडणाऱ्या कृपामयीजवळचा रेल्वे उड्डाणपूल हा कोणत्याही परिस्थितीत पाडावाच लागेल. तसेच या पूलाला पर्यायी व्यवस्था करायची झाल्यास राज्य शासनाकडून ९ कोटी रुपये मिळायला पाहिजेत, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी व्यक्त केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी बुधवारी सांगली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. 

मिरजेच्या रेल्वे उड्डाणपुलाबाबत विचारणा केल्यानंतर यादव म्हणाले की, संबंधित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यात पुलाची क्षमता घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पूल पाडावाच लागणार आहे. पर्यायी पुलासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पर्यायी व्यवस्था करायची झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून ९ कोटी रुपयांची तरतूद करायला हवी. सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी चिंतामणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिक जागृती मंचने केली. यावर यादव म्हणाले की, संबंधित ठेकेदाराला एप्रिलअखेरची मुदत दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत एप्रिलमध्ये पुलाचे काम पूर्ण होईल. मिरज स्थानकाच्याबरोबरीने सांगली स्थानकाचा विकास करावा, अशी मागणीही यावेळी नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आली.
To Top