भावी आमदारांचे विजयासाठी श्रीरामाला साकडे !
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत नुकताच पार पडला. यानिमित्ताने तासगाव-कवठेमंकाळ मतदार संघातील दोन्ही युवा नेते 22 जानेवारी रोजी तासगाव शहरातील ठिक-ठिकाणी फिरून श्रीरामाच्या आनंदोत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आले. सिद्धेश्वर रोड येथील श्रीराम मंदिर तसेच दाणे गल्ली येथील श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित राहून युवा नेत्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले असून आमदारकीच्या शर्यतीमध्ये असणाऱ्यांनी विजयासाठी प्रभू श्रीरामांकडे साकडे घातले असावे ! अशी चर्चा रंगली होती. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने देशभरात सगळीकडे उत्साह होता.
तासगाव मधे सकल हिंदू समाजातर्फे प्रभू श्रीरामांच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सायंकाळी दीपोत्सव व फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली. दरम्यान, तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातील दोन्ही युवा नेत्यांनी मंदिरात श्रीरामांचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या, कार्यकर्त्यांची विचारपूस केली, संवाद साधला.
तासगाव शहरात संध्याकाळी सगळीकडेच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यावेळी ठिकठिकाणी फिरून विविध मंदिर, संघटना यांना उभयतांनी भेटी दिल्या. त्यामुळे आता आमदारकीच्या विजयाचे माप प्रभू श्रीराम कोणाच्या पारड्यात टाकणार याकडे तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.