भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस : नाना पटोले
मुंबई: डिजिटल हॅलो प्रभात
महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा ‘हिशोब’ करणार आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, सरकारचे हे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
अंतरिम अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारने कोणत्या विभागाला किती रुपयांची तरतूद केली याच्या मोठ्या घोषणा केल्या परंतु सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता यातील कशाचाही फायदा सर्वसामान्य जनतेला होणार नाही. राज्यातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहे पण सरकार त्यांना मदत करत नाही. मागील काळात जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. राज्यातील तरुण रस्त्यावर आहेत, नोकरी भरती होत नाही. स्पर्धा परिक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, पेपर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत परंतु सरकारने तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. महिला सक्षमीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या पण क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी किती सुरक्षित आहेत हे सर्वांना माहित आहे. हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत, महिला अत्याचार वाढले आहेत, सरकार जर खरेच महिला सक्षमीकरणाबद्दल गंभीर असते तर महिला अत्याचार वाढले नसते.
सरकार प्रत्येक अधिवेशनात पुरवण्या मागण्या आणते पण त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर मिळत नाही. सरकारने आधी ७५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्यानंतर ४० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आणि आता ८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, दिवाळखोरी निघालेली असते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या सादर केल्या जातात. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? महायुती सरकारला आर्थिक शिस्त नाही, राज्यावर कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. ‘ऋण काढून सण साजरा’ करण्यासारखा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसीत भारताच्या संकल्पनेला पुरक असा अर्थसंकल्प असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. कारण मोदींची गॅरंटीच फसवी आहे तर मोदींच्या पावलावर चालणाऱ्या या महायुती सरकारच्या गॅरंटीवर तरी कोण विश्वास ठेवणार? असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.