बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजप प्रवेश ; उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले स्वागत

Admin
बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजप प्रवेश 
उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले स्वागत

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 

माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल,मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, खा.सुधाकर शृंगारे,खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते.



उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात हातभार लावण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीत अनेक जण प्रवेश करीत आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या इच्छेनेच बसवराज पाटील यांच्यासारखं जुनं, जाणतं आणि सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पार्टीत सहभागी झालं आहे. बसवराज पाटील, रश्मी बागल यांच्यासारखे नेते कोणत्याही अपेक्षेने पक्षात आलेले नाहीत. त्यांच्याकडून समाजहिताच्या ज्या मागण्या मांडल्या जातील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.


To Top