चंद्रहार पाटलांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश
पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात
येत आहेत : उद्धव ठाकरे
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिवसेना उबाठा गटाला सांगलीत दमदार उमेदवार मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मातोश्रीवर आज पक्षप्रवेश पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं आहे.
माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्या विरुद्ध लढण्याची कुणाची छाती होणार नाही. पक्षातून पळपुटे नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत.शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी आपल्या पक्षात आले. 'अबकी बार चंद्रहार' पण फक्त घोषणा देऊन चालणार नाही, सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल. गदा आणि मशाल मर्दाच्या हातात शोभतात. लोकांनी ठरवलंच आहे, त्याला मी काय संकेत देणार. जनतेनं एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे. हीच गदा आणि मशाल घेऊन आपल्याला एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. जनता आपल्याकडे अपेक्षेनं बघते आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, डबल 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा वैभव शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी कुस्तीचं मैदान गाजवलं आहे. ते कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत. चंद्रहार शिवसेनामध्ये सामील होतोय. शिवसेनेच्या मशाली सोबत चंद्रहारची गदा असणार आहे. चंद्रहारला जिथे पाठवायचा आहे, तिथे पाठवणारच. त्याला आता कोणी रोखू शकत नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.