परतीचा प्रवास ठरला अखेरचा ! तासगाव जवळील भीषण अपघातात सहा ठार तर एक गंभीर

Admin
परतीचा प्रवास ठरला अखेरचा !
तासगाव जवळील  भीषण अपघातात सहा ठार तर एक गंभीर

तासगाव : डिजिटल हॅलो प्रभात
वाढदिवस साजरा करून परतताना तासगाव नजीक झालेल्या भीषण अपघातामध्ये ६ जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कवठेमहंकाळ येथील कोकळे गावामध्ये राजवी भोसलेचा 3 रा वाढदिवस साजरा करून कुटुंबीय मंगळवारी मध्यरात्री तासगाव कडे परतीचा प्रवास करत होते. चार चाकी वाहन मारुती अल्टो क्र. एम. एच.10 ए. एन. 1497 मधून अभियंता राजन पाटील (वय 65), सुजाता पाटील (60) दोघे राहणार तासगाव प्रियांका खराडे (33), ध्रुवी खराडे (6), कार्तिकी खराडे (6 महिने) तिघे रा. बुधगाव, राजवी भोसले (3) रा.कोकळे यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर स्वप्नाली भोसले (२६) या गंभीररीत्या जखमी झाल्या असून खाजगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहेत.
        तासगावकडे परतत असताना राजन पाटील गाडी चालवत होते. तासगाव पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पाणी नसलेल्या कॅनॉल मध्ये आदळली. अपघातानंतर गंभीर दुखापत झालेल्या स्वप्नाली रात्रभर मदतीसाठी आरडाओरड करत होत्या, परंतु वर्दळ कमी असल्याने मदतीच्या हाकेला ओ मिळू शकली नाही. वेळीच मदत मिळाली असती तर काही जणांचा जीव वाचवता आला असता अशी चर्चा आहे.
        बुधवारी (दि.२९) पहाटे सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या नागरिकांना ही घटना आढळून आली. त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरू झाले. अपघाताची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी बघ्यांची गर्दी वाढल्याने तासगाव -मणेराजुरी रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सदर अपघाताची तासगाव पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास स.पो. नि. मोरे करत आहेत.
Tags
To Top