स्वप्नीलच्या कुटुंबीयांना आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून 5 लाखाचा धनादेश प्रदान

Admin
स्वप्नीलच्या कुटुंबीयांना आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून 5 लाखाचा धनादेश प्रदान

कोल्हापूर : हॅलो प्रभात 
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या स्वप्नील कुसाळे याच्या यशाबद्दल आ. सतेज पाटील व आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या रकमेचा धनादेश ऋतुराज पाटील यांनी आज कांबळवाडी (ता. राधानगरी ) येथील त्याच्या घरी जाऊन वडील सुरेश कुसाळे व आई कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अनिता कुसाळे यांच्याकडे सुपूर्द केला.

आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, स्वप्निलचे हे यश अनेक युवकांना प्रेरणादायी आहे. स्वप्निलच्या आई-वडिलांनी केलेले कष्ट आणि समर्पणही फार महत्त्वाचे आहे. यापुढेही स्वप्निल आपल्या खेळातून देशाचे नाव आणखी उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला .यावेळी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलचा जिद्द, चिकाटी, नम्रता, मेहनत आणि संघर्षपूर्ण प्रवास उपस्थितांसमोर मांडला. देशासाठी पदक जिंकल्यानंतर स्वप्निलने घरच्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधल्यानंतरचा भावुक प्रसंगही त्यांनी सांगितला. याप्रसंगी जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, मोहन धुंदरे, सतीश बरगे सर , स्वप्निलचे काका शिवाजीराव कुसाळे, भाऊ सुरज कुसाळे, आजी - आजोबा यांच्यासह कुसाळे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
To Top