मिरवणुकीत दहा हजार नागरिकांचा सहभाग
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मिरवणूकीत गावातील नागरिकांच्यासह पंचक्रोशीतील सुमारे दहा हजार शिवभक्तांचा सहभाग होता.यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जय कराने व घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सम्राटबाबा महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीला कापूरवाडी येथून सुरुवात झाली.पेठनाका, आंबेडकर पुतळा,पेठ गावचे प्रवेशद्वार, बाजारपेठ कदम गल्ली, धनगरवाडा,माणकेश्वर गल्ली,गोळेवाडी अशा या गावच्या प्रमुख भागातून महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक निघाली. घोडे,वारकरी सांप्रदायातील लोकांची व वारकऱ्यांची दिंडी, पोवाडा,झांज पथक, धनगरी ढोल,मर्दांनी खेळांचे प्रकार यांच्यासह अन्य पारंपारिक वाद्याच्या गजरात शोभायात्रा संपन्न झाली.
यावेळी सम्राटबाबा महाडीक म्हणाले,पेठ गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनाने वातावरण अतिशय सुखद झाले आहे.प्रत्येक नागरिकांच्या मनात आज अभिमान दिसत होता.खऱ्या अर्थाने आज पेठ वासियांची स्वप्नपुर्ती झाली आहे.आजचा दिवस प्रत्येकाच्या घरात सणापेक्षा कमी नव्हता. या मिरवणूकीचे संयोजन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्त्यांनी केले.