98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
स्वागताध्यक्षपदी शरद पवार
मुंबई : हॅलो प्रभात 1954 साली दिल्लीला 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा 21,22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीत पार पडणार पडणाऱ्या या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपदी शरद पवार आहेत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला. त्यातूनच पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी आज मान्य केली.
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून या पार्श्वभूमीवर 70 वर्षांनी दिल्लीत होणार्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात असून त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नितीन गडकरी, यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शरद पवारांनी या आधी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) , सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे.