फ्रीजमधून सोन्याचे दागिने लंपास
मंगळसूत्रासह ३ लाख १४ हजाराचा ऐवज लंपास
सांगली : हॅलो प्रभात
येथील विजयनगर चौकातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील कुटुंब बाहेरगावी गेल्याच फायदा घेत चोरट्याने घरफोडी करून ३ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे हे दागिने कुटुंबीयांनी फ्रीजमध्ये लपविले होते. तरीही चोरट्याने ते शोधण्यात यश आले. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा विश्रामबाग पोलिसांत दाखल झाला आहे. संजय दत्तात्रय सेवेकर (रा.आशीर्वाद अपार्टमेंट प्लॅट नं २०१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घरफोडी २९ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर यादरम्यान घडली. फिर्यादी संजय सेवेकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खोखडपुरा येथील आहेत.
सेवेकर हे व्यवसायाच्या निमित्ताने सांगलीतील विजयनगर चौकात राहतात. २९ नोव्हेंबर रोजी संजय सेवेकर व त्यांची पत्नी मूळ गावी खोखडपुरा येथे गेले होते. गावी जाण्यापूर्वी त्यांनी घरातील सोन्याचे दागिने फ्रिजमध्ये लपवून ठेवले होते. चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शोधाशोध करीत फ्रिजमध्ये लपवलेले दागिने लंपास केले. दरम्यन स्वयंपाकघरातील फ्रीजमध्ये निळ्या पिशवीत लपवून ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, झुब्यांचा एक जोड, चांदीचे पैजण, सोन्याच्या वाट्या व २५ मणी असा ३ लाख १४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. १४ डिसेंबर रोजी कुटुंबीय परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत, चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला.