फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
मुंबई : हॅलो प्रभात
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला.महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही घटक पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 50 जागा मिळाल्या तर दुसरीकडे महायुतीला 231 जागा जिंकल्या. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी सादर करत महायुतीवर निशाणा साधला. याला आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.गेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारी सादर करत फडणवीस यांनी पवारांवर यांच्यावर पलटवार केला आहे.
शरद पवार काय म्हणाले ?
महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. मात्र, मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. काँग्रेसला 80 लाख मते पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास 41 आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते 72 लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त 10 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 58 लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले, याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा ? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा.
याचबरोबर, "2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या", असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, असे म्हटले आहे. तसेच, शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्याची अपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.