...तर एकनाथ शिंदे ठाकरेंना सोडून बाहेर
पडले नसते ; भाजपा नेत्याची टीका
मुंबई : हॅलो प्रभात
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार ? कोणाचे किती आमदार मंत्री म्हणून शपथ घेणारे ? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा चर्चाना उधाण आले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठका थांबल्या आहेत. तर दुसरीकडे, भाजपासह महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीच्या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरूच आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केली असून, माजी नगरसेवकांना आणि नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपावरती केलेय टीकेचा भाजपा नेते प्रसाद लाड यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.मीडियाशी बोलताना प्रसाद लाड यांनी सांगितले की,आता उफाळलेले प्रेम चार ते पाच वर्षांपूर्वी उफाळले असते, तर कदाचित एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून कधी बाहेर पडले नसते. ज्या पद्धतीने कार्यकर्ते, आमदारांचा अपमान, मंत्र्यांचा अपमान, एकनाथ शिंदे यांचा अपमान सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केला, त्यामुळे हिंदुत्वाचा बंड झाला आणि खरी शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कोणता विषय राहिलेला नाही. कार्यकर्त्यांना जागे ठेवायचे असेल, तर बैठका घ्यावा लागतात. परंतु, आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशा शब्दात लाड यांनी निशाणा साधला.