खिशात ठेवलेल्या मोबाईलचा ब्लास्ट झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली. महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलने शिक्षकाचा जीव घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध इथं शुक्रवारी रात्री घडली. सुरेश संग्रामे (55) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (56) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे.
दरम्यान, सुरेश संग्रामे आणि त्यांचे नातेवाईक नत्थु गायकवाड हे दोघेही नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं निघाले असताना सुरेश यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला, यात सुरेश संग्राम यांचा मृत्यू झाला. तर नत्थु गायकवाड हे जखमी झाल्याने त्यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. महिन्याभरापूर्वीच शिक्षकाने हा मोबाईल खरेदी केल्याची माहिती आहे. या मोबाईलची मॅन्युफॅक्चरिंग हे 2024 जुलै महिन्यातली आहे.
दरम्यान,दुय्यम दर्जाच्या कंपनीचा मोबाईल घेतला असेल आणि त्यात डुप्लिकेट बॅटरी टाकली असेल तर, दुय्यम दर्जाचा चार्जर वापरल्याने मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. इतर मोबाईल युजर्सने घाबरून जाण्याचे कारण नाही. चांगल्या कंपनीचाच मोबाईल घेणे आणि मोबाईलमध्ये बॅटरी बदलताना संबंधित कंपनीची व उत्कृष्ट दर्जाचीच घ्यायला हवी, असा सल्ला मोबाईल टेकनॉलॉजी एक्स्पर्टसनी दिला आहे.