पंचायत समितीचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
कुंभोज : हॅलो प्रभात शासनाच्या रमाई आवास योजनेतील दोन हप्ते जमा करण्यापोटी तेरा हजार रुपयाची लाच मागणी करून तडजोडी अंतिम दहा हजार रुपये स्वीकारताना मूल्यांकन करणारा हातकणंगले पंचायत समिती कडील बांधकाम विभागाचा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश अशोक सुतार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उचगाव पुलाजवळ सापळा लावून पकडण्यात आलं. त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की...
करवीर तालुक्यातील हसूर दुमाला इथल्या अविनाश सुतार हा हातकणंगले पंचायत समिती कडील जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून काम करतो. तो घरकुल योजनेचे मूल्यांकन करण्याचे काम करतो. तक्रारदार यांच्या आईचे रमाई आवास योजनेतून 2024 - 2025 सालासाठी दीड लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे पैसे पाच टप्प्यात मिळतात. लाभार्थीच्या खात्यावर तीन टप्प्याचे एक लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित दोन टप्प्याची रक्कम कधी जमा होणार हे विचारण्यासाठी तक्रारदार हातकणंगले पंचायत समितीत गेले होते. त्यांनी या कामासाठी गृहनिर्माण अभियंता सुतार याची भेट घेऊन उर्वरित दोन हप्ते कधी मिळणार असे विचारले.
यावेळी सुतार यांनी तेरा हजार रुपयाची मागणी करून दहा हजार रुपयांवर तडजोड केली. याबाबत तक्रारदार यांनी कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.ही तडजोडीतील रक्कम करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या पुला जवळ स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, विकास माने, सुधीर पाटील संगीता गावडे, उदय पाटील यांच्या पथकाने केली.