जमिनीच्या मोजणीसाठी मागितली ५० लाखांची लाच ; दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Admin
जमिनीच्या मोजणीसाठी मागितली ५० लाखांची लाच
दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

हवेली : हॅलो प्रभात
पुणे जिल्ह्यातील हवेली येथील भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन मोजणीच्या प्रकरणात ५० लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर ती दिली नाही म्हणून चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याप्रकरणी हवेली येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिकारी किरण येटाळे या दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराने हडपसर येथील मिळकतीची शासकीय शुल्क भरून मोजणी करून घेतली होती. त्यानंतर या मिळकतीची हद्द निश्चित करण्यासाठी संबंधित तक्रारदार हे हवेली भूमी अभिलेख कार्यालयात पाठपुरावा करत होते. या दरम्यान, त्यांना भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने हद्द निश्चित करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. तर मोजणी अधिकारी किरण येटाळे याने २५ लाख रुपयात हे काम करून देतो असं सांगितलं.
तसेच तुम्ही रक्कम दिली नाही तर अमरसिंह पाटील हा अधिकारी हेलिकॉप्टर शॉट लावेल अशी धमकी देत मालमत्तेचं नुकसान करण्याची भीती घातली. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मिळकतीलगतच्या जमिनींची चुकीची ‘क’ प्रत तयार केली. त्यामुळं तक्रारदाराला अक्षरश: मानसिक आणि आर्थिक सोसावा लागला. या तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली.
या प्रकरणी पोलिसांनी आता भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि मोजणी अधिकारी किरण येटाळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने यापूर्वी बारामतीतही काम केले आहे.हवेली येथे नियुक्ती झाल्यापासून हा अधिकारी चर्चेत होता.
To Top