![]() |
क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर अडचणी सोडविण्यासाठी साधला संवाद |
सांगली : हॅलो प्रभात
जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा होत आहे. या अनुषंगाने 18 व 19 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या आवर्तन संबंधी भूसंपादन संबंधी अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या मोहिमेअंतर्गत टेंभू उपसा सिंचन योजनेमधील लिंक कॅनॉल 1 व 3 अंतर्गत कडेगाव व खानापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. टेंभू टप्पा क्रमांक 5 येथे विटा तालुक्यातील हिवरे व पळशी तसेच विस्तारित टेंभू योजनेअंतर्गत माण तालुक्यातील दोरगेवाडी, नरवणे काळेवाडी, किरकसल येथील शेतकऱ्यांना नवीन योजनांची माहिती देण्यात आली.
ताकारी योजनेअंतर्गत कुमठे, कवठेएकंद, मतकुणकी, मणेराजुरी, वासुंबे, उपळावी, जाधवनगर बलवडी येथे शेतकऱ्यांशी चर्चा करून तक्रार निवारण करण्यात आले. सांगली पाटबंधारे विभागामार्फत जयसिंगपूर, आष्टा, कारंदवाडी, इस्लामपूर, शिराळा येथे व नांद्रे, बुधगाव, घालवाड, कसबे- डिग्रज, वसगडे को.प. बंधारा येथील पाणी वापर संस्थांशी चर्चा करण्यात आली.